उजेड पेरणारी व्यक्ती!
काही व्यक्ती आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटतात पण काहींच्या भेटण्याने आयुष्यालाच वेगळे वळण लागते. भूतकाळातील अंधारवाटेवर हातात कंदील घेऊन उभ्या असणाऱ्या अनेकांनी आपला प्रवास समृद्ध केलेला असतो,पण प्रवाशाच्या हातात प्रकाशाचे दान देऊन त्याच्या वाटा उजळून काढणाऱ्या काही मोजक्याच व्यक्ती आपल्याला लाभतात. प्राचार्या कुंदा हळबे अशीच एक व्यक्ती जिने माझ्यासारख्या कित्येकांच्या आयुष्यात उजेड पेरला. आज कोणत्याच अंधाराची भीती वाटत नाही कारण कुंदा हळबे ही व्यक्ती प्रत्येक अवघड वळणावर कधी कंदील घेऊन उभी असते तर कधी स्वतःच कंदील होऊन सोबत असते.
गोष्ट साधारणतः पंधरा वर्षांपूर्वीची आहे,माझी फारशी इच्छा नसताना D.Ed ला प्रवेश घेऊन महिनाच झाला असावा.हातात प्रवेश रद्द करण्यासाठीचा अर्ज घेऊन प्राचार्यांच्या केबिनमध्ये मी पाऊल टाकले आणि गोंधळलेल्या आवाजात हळबे मॅडमला म्हणालो,'मॅम,मला शिक्षक होऊन नोकरी करायची नाही, चार भिंतीच्या चौकटीत मी राहू शकत नाही त्यामुळे माझा प्रवेश रद्द करून दुसऱ्या कुणाला माझी सीट द्यावी' माझे हे आर्जव ऐकताच मॅडम शांतपणे म्हणाल्या,'ठिकाय मग तू बिनभिंतीच्या शाळेचा शिक्षक हो! त्यासाठी या कोर्सचा तुला फायदाच होईल'.पुढील तासभर हळबे मॅम ने शिक्षणाची व्यापक संकल्पना खूप सुंदर पद्धतीने मला समजावून सांगितली आणि माझा प्रवेश रद्द करण्याचा विचार गळून पडला. पुढची अडीच-तीन वर्ष हळबे मॅडमच्या समृद्ध अनुभवाचा खजिना मी लूटत आलो
काय होतं या खजिन्यात? काय नव्हतं म्हणून विचारा!
या खजिन्यात चपला- शूज रांगेत लावण्यातील नीटनेटकेपणा आणि सौंदर्यदृष्टी होती. न्यूनगंडावरचं प्रभावी औषध होतं या खजिन्यात! आपल्या दुःखावर हळुवारपणे फुंकर घालणारी अध्यात्माची झालर होती.स्त्री-पुरुष समानतेचे कृतीयुक्त धडे होते. या खजिन्यात साधेपणाला सामर्थ्यशाली बनवण्याची शिकवण होती. ज्ञान आणि शहाणपण यातला फरक दर्शवणारी स्थितप्रज्ञता होती.
केवळ अभ्यासक्रमाचा भाग म्हणून नव्हे तर 'सहानुभूती' आणि 'समानुभूती' यातला फरक लक्षात यावा म्हणून अनाथाश्रम, वृद्धाश्रम ,अंध- अपंग मूकबधिर विद्यार्थ्याच्या शाळा याच्या कित्येक भेटी मॅडमने फक्त घडवूनच आणल्या नाहीत तर त्या घटकांसोबत संवाद- सहवास घडावा यासाठी कायम प्रोत्साहित केलं. आश्चर्य वाटेल पण माझ्या आयुष्यातील पहिला सिनेमा मी थिएटरला पाहिला तो सुद्धा हळबे मॅडम मुळेच! मनाला पछाडणाऱ्या न्यूनगंडांची,भीतीची कितीतरी भुतं त्यांनी माझ्या मानगुटीवरून उतरवली तेही माझ्या नकळतपणे! मी कॉलेजला शिकत असताना त्यांनी मला व्याख्याने, प्रवचने, कविता, वक्तृत्व या माझ्या आवडीच्या प्रांतात मुक्तपणे बाहेर फिरू दिलं,कौतूक केलं,माझ्या एका छोटेखानी पुस्तकाचा भव्य प्रकाशन समारंभ बारामतीतील गदिमा सभागृहात त्यांनी घडवून आणला आणि आग्रह करूनही स्वतः स्टेजवर न येता प्रेक्षकांच्या रांगेतूनच त्यांनी आशीर्वाद दिले! मी दुसऱ्या दिवशी धन्यवाद द्यायला गेलो तर नेहमीचा कित्ता गिरवला -'अरे दिनेश मी निमित्तमात्र! तुझं यश तुझं आहे, तुझ्या पात्रतेमुळे!' कर्तृत्व नसताना एखाद्या समारंभात स्टेजवर पुढं पुढं करणारी अनेक माणसं मी अनेकदा पाहतो तेव्हा हळबे मॅम हमखास आठवतात!
.''शिक्षकांनी शिकवू नये तर शिकायला मदत करावी, विद्यार्थ्यांना शिकायला आनंद वाटेल असं वातावरण तयार करावं" यासाठी मॅडमचा कायम आग्रह असायचा.'विषयाचं उद्दिष्ट्यच साध्य होणार नसेल तर पाठ्यपुस्तकाला काहीही महत्व नाही' हे त्यांनी आमच्या मनावर बिंबवलं.पुढे आम्ही सुरू केलेल्या 'स्वयंप्रेरणा हॅप्पी लर्निंग सेंटर' मध्ये कायम हळबे मॅडमच्या या शिकवणुकीचा अवलंब करीत आलो आहोत आणि याचे जबरदस्त फायदेही मिळत आहेत.
खरं म्हणजे मॅडमचे आजोबा, वडील,भावंडे आणि बहुतांश जवळचे नातेवाईक डॉक्टरी पेशात असले तरी त्यांनी त्याकाळी वेगळी वाट निवडली, शिक्षकी पेशाला जीव लावला, हजारो विद्यार्थ्यांवर ,सहकाऱ्यांवर आपली आगळी- वेगळी छाप सोडली.विविध राज्यात, परदेशातही शैक्षणिक उपक्रम राबविले.त्यांची ऊर्जा आणि उत्साहाचा मी प्रचंड चाहता राहिलेलो आहे.
आज सेवानिवृत्तीनंतरही सत्तरीच्या उंबरठ्यावर कुटुंबियांना वेळ देत तेवढ्याच उत्साहाने त्या शैक्षणिक सामाजिक उपक्रमात कार्यरत आहेत.अहमदनगर भागात कधी गेलो की गाडीची चाके आपसूकच मॅडमच्या घराकडे वळतात. लुटता येईल तेवढा त्यांच्या समृद्ध अनुभवाचा खजिना लुटून घेतो.कोणताच गाजावाजा न करता शांतपणे उजेड पेरणारी माणसं आपल्या आयुष्यात आहेत याचं मनस्वी समाधान लाभतं.लिहायला बसलो खरा पण 'कुंदा हळबे ' या व्यक्तीला शब्दांत मांडता येत नाही...उजेड थोडाच चिमटीत पकडता येतो!
आज हळबे मॅडम यांचा वाढदिवस !आपणांस समृद्ध,आरोग्यदायी दीर्घायु लाभो!
आपलाच,
-दिनेश आदलिंग
31 मे, 2020
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा