ब्लॅक अँड व्हाईट सेवाव्रत
हिंगसे आप्पांची आणि माझी पहिली भेट कधी झाली हे नीट आठवत नाही पण प्रत्येक भेटीत आप्पांची ओळख नव्याने होत गेली. हिंगसे आप्पा अर्थात- हरिभाऊ बाबुराव हिंगसे,वय फक्त ७८ आणि उत्साह २८च्या तरुणाईला लाजवेल असा! शिक्षण-जुनी मॅट्रिक. कायम काळसर रंगाची पॅन्ट आणि त्यावर फिक्कट पांढरा शर्ट हा आप्पांचा ठरलेला 'ब्लॅक अँड व्हाईट' पेहराव. सोबत गळ्यात दोरीत ओवलेला नोकियाचा जुना,साधा मोबाईल ! आप्पांना कधीही भेटा, सतत कसल्यातरी कामात व्यस्त.पण चेहऱ्यावर कसलाच चिडका भाव नाही की वय झाल्याच्या तक्रारी नाहीत! पाचवी-सहावीतल्या विद्यार्थ्याने ज्या निरागसतेने आणि उत्सुकतेने एखादी नवीन गोष्ट शिकावी तीच भावना कायम चेहऱ्यावर...
आप्पांना थांबणे बिलकूल पसंत नाही म्हणूनच की काय १९६४ पासून २००१ पर्यंत शासनाच्या आरोग्य विभागात ३७वर्ष 'कुष्ठतंत्रज्ञ' म्हणून रुग्णसेवा करून 30एप्रिलला सेवानिवृत्ती आणि 1मे ला लगेचच बारामतीतील डॉ. भोईटे यांच्या 'गिरीराज हॉस्पिटल मध्ये 'समन्वयक' म्हणून पुढची १८वर्षे ते पूर्णवेळ कार्यरत होते.आयुष्यातली सलग पंचावन्न वर्षे हजारो रुग्णांना मदत केल्याचा कृतार्थ भाव आप्पांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसतो.विविध योजनांतर्गत रुग्णांना आजपर्यंत ११ कोटीपेक्षा जास्त अर्थसाहय्य मिळवून देताना कोणाचे ११ रुपयेच काय पण रुग्णाचा चहाही फुकट प्यायचा नाही हे ब्रीद आप्पांनी आजपर्यत निगुतीने पाळलेलं आहे.
फक्त रुग्णसेवेत खुश असतील ते आप्पा कसले! त्यांच्या मते तो त्यांच्या कामाचाच भाग आहे.आपल्या हातून काहीतरी समाज विधायक घडावं म्हणून १९९० पासून आप्पा डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत ‘अंनिस’ मध्ये सक्रीय झाले ते आजतागायत! व्याख्याने,चमत्कारांचे सादरीकरण आणि प्रबोधनकार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले.'अंनिस'ची बैठक असो अथवा आरोग्य शिबीर अत्यंत मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण बोलणारे आप्पा पाहिले की शिकणाऱ्याला संभाषणकौशल्याचे कित्येक पैलू उलघडल्याशिवाय राहत नाहीत.याचा मी सुद्धा लाभार्थी आहे! पण प्रबोधन हे फक्त लोकांना शिकवण्यापुरतं नव्हे तर स्वतःच्या जगण्यातही उतरायलाच हवं हा त्यांचा आग्रह ! त्यामुळेच स्वतःच्या कुटुंबियांचे,नातेवाईकांचे मरणोत्तर नेत्रदान,सत्यशोधक विवाह,आईच्या प्रत्येक स्मृतीदिनी आजपर्यंत ३६ रक्तदान शिबिरे त्यांनी घडवून आणली.व्यसनमुक्ती समुपदेशन असो की मनोरुग्णांच्या उपचारासाठी पाठपुरावा असो हिंगसे आप्पांचा पुढाकार असणारच,पुतण्याचा कर्मकांड विरहीत सत्यशोधकी विवाह आप्पांनी घडवून आणला त्या कार्यक्रमाला जेष्ठ अभिनेते निळू फुले,डॉ. दाभोलकर,राम नगरकर यांनी आवर्जून उपस्थित राहून कौतूक केलं, आप्पांच्या कामाला उर्जा दिली.
आप्पांना काही संस्थांनी पुरस्कार देवून गौरवले पण ना त्याचा त्यांनी कधी गवगवा केला,ना त्याची हवा त्यांच्या डोक्यात कधी गेली.आप्पा फक्त काम करीत राहिले. गिरीराज हॉस्पिटलच्या जवळपास 300 आरोग्य शिबिरांच्या आयोजनात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला.अशा आकड्यात मोजता येणाऱ्या असंख्य गोष्टी आणि कित्येक किस्से सांगता येतील पण मला हिंगसे आप्पा जास्त भावतात ते त्यांच्यातील साधेपणा,सचोटी,नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती,सकारात्मकता,आणि समर्पणवृत्ती या गुणांमुळेच!
आप्पांचं बालपण अत्यंत हालाखीत एका झोपडीत गेलं.पत्नी कस्तुर यांनी आयुष्यभर भाडोत्री घरात कसलीही कुरकूर न करता त्यांना साथ दिली.मग आप्पांनी सेवानिवृत्तीनंतर स्वतःचं छोटेखानी तीन खोल्यांचं टुमदार घर बांधलं,घराला 'कुष्ठसेवा'असं नाव दिलं.अर्थातच घराची ‘वास्तुशांत’ किंवा 'सत्यनारायण' अशा भानगडीत न पडता मान्यवरांसोबत सरळ पत्नीच्या हातून फीत कापून गृहप्रवेश केला!मला वाटतं पत्नीने आयुष्यभर केलेल्या त्यागाचा सन्मानच होता हा!
संजीवनी,संगीता,किरण आणि किशोर या आपल्या चारही मुला-मुलींना चांगलं शिक्षण आणि संस्कार देवून,सांसारिक जबाबदारया उत्तमपणे पार पाडून नऊ नातवंडे आणि पाच पतवंडे अशा कुटुंबकबिल्यात - तरी हे त्यागावे ना भोगावे|मध्यभागे विभागावे|| या उक्तीप्रमाणे आप्पांची मार्गक्रमणा आनंदात चालूच आहे...
जिथं -जिथं जे देणं शक्य आहे ते आप्पा ऐपतीप्रमाणे आजपर्यंत देत आले.कधी देणगी,कधी कपडे कधी पुस्तके तर कधी अगदी धनिकांकडून चपला,बूट घेऊन गरजवंतांची पायपोळ दूर करण्याचा उपक्रमही आप्पांनी राबवला आणि हे करतानाच स्वतःचा मरणोत्तर नेत्रदानाचा फॉर्म भरायला सुद्धा आप्पा आघाडीवरच राहिले.(अर्थात हे सगळं कोणत्याही प्रसिद्धिविना!) जीवनाच्या गरजा मर्यादित ठेवून आप्पांनी कायम 'देण्याचा' धर्म पाळला.
खरंतर,मुलाबाळांच्या संसारात ढवळाढवळ न करता कमळाच्या पानांसारखं मेणाचं कवच धारण करून अलिप्त राहणं,सर्वांवर प्रेम करीत,संसार आणि समाजसेवा याचा मेळ घालत, बऱ्या- वाईट प्रसंगात स्वतःला ढासळू न देता धीरोदात्तपणे कणखर भूमिका घेणं, मोहाच्या प्रसंगी आपली जीवनमूल्ये आणि तत्वांवरील निष्ठा कायम ठेवणं.... मला वाटतं यापेक्षा वेगळं काय असतं अध्यात्म!
आप्पा प्रयत्नवादाला महत्व देत निस्पृहपणे आयुष्याची वाट तुडवत राहिले,प्रवास सुकर आणि सुखकर करायचा असेल अपेक्षांची गाठोडी सोबत बाळगायची नाहीत हे आप्पांच्या जगण्याचं साधं तत्वज्ञान !
आप्पा चारचाकी गाडी घेवू शकले असते पण त्यांनी दुचाकीही घेतली नाही.पत्नी खालोखाल आप्पांनी सर्वात जास्त कोणावर प्रेम केलं असेल तर ती म्हणजे त्यांची प्रिय सायकल!गेली सत्तर वर्षे आप्पा सायकलच वापरतात! आजही किमान तासभर सायकलवरून फेरफटका मारल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही.व्यायाम आणि आहार याबाबत तडजोड जवळपास नसतेच!
दोन वर्षांपूर्वी आप्पांच्या प्रिय पत्नीचं निधन झालं...साडेपाच दशकांची सोबत क्षणात सुटली.आता आप्पा एकटेच असतात घरात...सतत वाचनात ,कामात गुंतलेले...आप्पांच्या घरात भिंतीवर देवी-देवतांचे फोटो नाहीत पण हॉलमध्ये एक पत्नीसोबतचा सुंदर फोटो आहे दोघांचा ! जुना १९६४सालातला, प्रसन्न मुद्रेतला...ब्लॅक अँड व्हाईट!
....मग आप्पा त्या 'ब्लॅक अँड व्हाईट' फोटोची गोष्ट सांगतात... पण ती गोष्ट फक्त फोटोची नसतेच ! मग जाणवतं इतरांच्या आयुष्यात रंग भरणारी माणसं मुळची कायम ‘ब्लॅक अँड व्हाइट’च असतात,जुन्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातल्या हिरोप्रमाणे साधी,नैसर्गिक पण आभाळाएवढी !
आप्पा, आज तुमचा वाढदिवस ! ७८ वर्षांची पाऊलवाट तुम्ही समृद्ध केलीत... बक्कळ जगा.शंभराव्या वाढदिवसाला सकाळी-सकाळी तुमच्या ‘हिरो’च्या सायकलवरून 'रियल हिरो'ला फेरफटका मारताना पाहायचंय आम्हाला...
खूप सदिच्छा!
---दिनेश आदलिंग
9 एप्रिल,2021
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा