पहिलं प्रेम...... जगण्यावर !!

          
           माझ्या स्वयंप्रेरणाच्या कार्यशाळेत भाग घेतलेल्या एका विद्यार्थ्याची छोटी गोष्ट. स्वयंप्रेरणाच्या पाच दिवसीय कार्यशाळेच्या तिसऱ्याच दिवशीचा विषय असतो-प्रेमाला प्रेरकशक्ती कसे बनवावे ? त्या दिवशीचं सत्र संपल्यावर एक 20 -21 वर्षाचा तरुण मुलगा धुमसतंच माझ्याकडे आला आणि म्हणाला.... "सर, प्रेमबिम सगळं झूट असतं,ज्या व्यक्तीवर आपण जीव ओवाळून टाकावा...स्वतःपेक्षाही ज्या नात्याला मी जपत होतो ती मुलगी अशी अचानक परकी व्हावी..? ती मला सोडून गेली याच दुःख नाही सर पण, तिने त्या बावळट, भंगारछाप काळ्या रोहनला जवळ करावं म्हणजे किती हा मूर्खपणा ... "  तो अस काही भडाभडा बोलत होता की , तिच्या विषयीचा सगळा राग , द्वेष , तिरस्कार डोळे पाणावून व्यक्त होत होता. मी शांतपणे विचारलं मग पुढे काय ? त्यावर त्याच उत्तर - सर खरं सांगू मला तर तिचा जीव घ्यावासा वाटतोय... नाहीत मी तरी...संपवाव वाटतंय सगळंच !
           माझ्या तरुण मित्रांनो, ऐन उमेदीत तारुण्याच्या उंबरठ्यावर सगळं 'संपवावस' वाटणं किंवा सगळं 'संपलंय' अस वाटणं आजकाल पावलापावलावर दिसून येईल, तसं वाटण्याला कारणं असंख्य असतील पण 'तिने मला नाकारलं' की किंवा 'त्याने मला झिडकारलं' म्हणून समोर सगळा अंधार झाला,हे सुद्धा तेवढंच ठळक कारण आहे. आणि मग 'ती तसं का वागली?' किंवा 'तो तसा का वागला?' या प्रश्नांच्या अंधारातून स्वतःचा मार्ग शोधताना 'ओ साथी रे... तेरे बीना भी क्या जीना' अशी गाणी गुणगुणत आपण आपलं सुरेख जगणं अगदी बेचव करून टाकतो.सतत सुतकी चेहरा,चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले, चेहऱ्यावरची माशीच काय पण एक रेषही न हलणारी तरुण मुलं-मुली अकाली म्हातारपण आल्यासारखी एकटी पडतात.कशा-कशातच मन रमत नाही.अभ्यासात लक्ष लागत नाही. काही-काही करावसं वाटतं नाही.तिचा किंवा त्याचा मसुम चेहरा डोळ्यासमोर तरळतो. समोरची व्यक्ती म्हणजे आपलं सर्वस्व आणि तेच जर आपल्याला मिळणार नसेल तर जगण्यात काय अर्थ ? आणि मग मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही ! 'कह दो की तुम हो मेरी वरना...जीना नही मुझे है मरना !'
     आयुष्याची आगगाडी प्रेमाच्या रुळावरून सुरळीत जात असताना अशा एखाद्या प्रेमभंगाच्या धक्क्याने डुगडुग करायला लागते. गती मंदावते तर कुणाची थांबते कायमचीच !अथांग सागरात आपली एकटीच नौका दिशाहीन झालीय आता आपलं अस कुणीच राहिलं नाही अशी धारणा करून कुढत कुढत जगण्याचा केविलवाणा प्रयत्न आपण करायला लागतो.
          माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो , आपलं आयुष्य 'बहुमोल' आहे त्याहून अधिक ते 'सुंदर' आहे आणि ते जगायचं ठरवलं की त्यात डोंगरदऱ्या खाचखळगे चढ उतार हे अटळ ! हा प्रवासच मुळात वळणावळणाचा ! त्यात तारुण्य नावाच्या सुंदर वळणावर प्रेमा-बिमाचा केमिकल लोचा होणारच. तुम्ही कोणाच्यातरी प्रेमात 'पडलात' किंवा कुणी तरी तुमच्यावरती खूप प्रेम करतंय हा तुमचा ,'तुमच्या' असण्याचा सन्मान आहे. पण खरं सांगू मित्रांनो प्रेम आयुष्यात 'पडून' राहायला शिकवत नाही ते तुम्हाला आयुष्यात उभं राहायचं बळ देतं,संकटांशी दोन हात करायला बळं देतं, ते प्रेम. दुबळे बनवतं ते नव्हे. आपलं आयुष्य हे इतक्या सहज मिळालेलं नसतं आणि म्हणून कुणी एखाद्याने किंवा एखादीने प्रेमास किंवा लग्नास नकार दिला  म्हणून ते आयुष्यचं संपवून टाकावं इतकही प्रेम थिल्लर नसावं. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही हा गवत समोरच्या व्यक्तीचा, तिच्या प्रेमाचाच अपमान नसून स्वतःच्या जगण्याचा जीवनाचा अपमान आहे.अजून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,  प्रेमाचा कधी 'भंग'होत नसतो... 'अभंग'असतं ते खरं प्रेम !
प्रेम भंग हा मला तरी मराठीत चुकीच्या अर्थाने वापरला जाणारा शबफ वाटतो कारण भंग प्रेमाचा नसतोच. भंग होतो अपेक्षांचा. माझ्या जोडीदाराने माझ्यासारखंच वागावं,मला वाटतं तेच करावं,याच्याशी बोलावं, त्याच्याशी बोलू नये,अमुक कपडे घालावीत, तमुक ठिकाणीच जावं ही असली फालतू बंधनं खऱ्या प्रेमात नसतात.प्रेमात एकाधिकार चालत नाही,असूही नये.एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलीच तर ती का गेल,याचा विचार जरूर करावा.चूक असेल तर माफी मागायलाही काही हरकत नाही पण केवळ तुम्हाला वाटतं म्हणून तिने तुमच्या सहवासात रहावं, तुमच्याकडे पाहून हसावं, लाघवी बोलावं हा हट्ट योग्य नाही. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, निसर्गानं ज्याचं त्याचं आयुष्य ज्याला त्याला बहाल केलंय. म्हणून तुम्हाला वाटलं तरी कुणाच्याही आयुष्यात हस्तक्षेप लरू नये आणि समोरच्याचं आयुष्य ओरबडण्याचा प्रयत्न ही नसावा कारण ते त्याचं स्वतःचं असतं म्हणून आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर सोडून  गेलेल्या 'त्या व्यक्तीला आणि नियतीलाही धन्यवाद द्या की जी व्यक्ती चारदोन वर्षे आपल्यासोबत नीट राहू शकत नाही ती आयुष्यभर कशी साथ निभावणार ? बरं झालं तिने तिचा रस्ता सुकर केला आणि आपलाही.
        एखादी व्यक्ती आयुष्याच्या एखाद्या वळणावर  भेटते आणि आयुष्याला वेगळं 'वळण' लागत ! म्हणून आपल्या पुरती तरी ती व्यक्ती ग्रेट असते.सर्वस्व असते म्हणून ' तिने आपल्या सारखंच असावं' हा आग्रह चुकीचा. आयुष्याच्या सहप्रवासात ती सोबत आलीच तर सोन्याहून पिवळं पण नाहीच आली तर आयुष्य कधीही,कुठेही,कुणासाठीही थांबत नसतं. कारण ती व्यक्ती नसतानाही आपण सुंदर जगत होतो म्हणून उद्या ती सोबत नसतानाही आपल्याला आपलं आयुष्य सुंदरतेने सजवता यायला हवं. प्रेम 'आंधळं' नसतं, नसावंही.ते 'डोळस' असायला हवं आणि ज्यांच्याकडे डोळे असतात त्यांच्याकडे दृष्टी असतेच असे नाही.खरं प्रेम जगण्याकडे पहायची दृष्टी आणि जगाकडे पाहायचा दृष्टीकोन देऊन जातं. शेवटी के मित्रांनो, प्रेम सुंदर आहेच पण त्याहून सुंदर आयुष्य ! कालपरवा आपल्या आयुष्यात येऊन आपलं सर्वस्व होऊ पाहणारी व्यक्ती आपल्याला सोडून गेली म्हणून 'जगणं' सोडून देण्याचा पळपुटेपणा बिलकुल करायला नको कारण ती व्यक्ती अगदी अनाहूतपणे येते आणि जाते पण आयुष्य इतकं 'अनाहूत' असतंच अस नाही ! त्याला भुतकाळ असतो अन भविष्याही...म्हणून पहिलं प्रेम.....जगण्यावर !!
प्रेम आधी जगण्यावर करावं मग एखाद्या माणसावर...
आधी झाडाला जगवून मग त्याच्या कणसावर.


    - दिनेश आदलिंग
लाईफ अँड बिजनेस कोच
www.swayamprerna.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधी हातपाय पसरा , अंथरूणाचं नंतर बघू ...!

बदलांना आलिंगन द्या !