मरणारा 'पळपुटा' नसतो.
14 June , 2020
माणूस मेल्यावर दुःख होतं,हळहळतो आपण,मरणारा सेलिब्रेटी असेल तर मीडियात श्रद्धांजलीचा पूर येतो( तसा नुकताच हत्तीणीच्या मरणानेही तो आला होता)पण आपल्या अवतीभवती,आपल्या परिचयाचा कोणीतरी रोज थोडा थोडा मरत असतो हे दिसत नाही आपल्याला.बेगडी असतो आपण,आणि तेवढंच दांभिकही.
खरंतर दुःखात सुख मानणं वगैरे शुद्ध मूर्खपणा असतो आणि असं कोणाला मानायला सांगणं म्हणजे मूर्खपणाचा कळस ! (कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं) दुःख हे दुःखच असतं ते दुःखाच्या ओंजळीनेच पिता येतं.आत्महत्या हा 'पळपुटेपणा' हे म्हणायला सोप्पय हो, पण जी व्यक्ती त्या टोकाला जाते,जगणं नाकारुन मरणाला कवटाळते ते नक्कीच तिच्यासाठी सोपं नसतं/नसावं.ऐकणारं,ऐकून घेणारं कोणीतरी आपलं माणूस जवळ असणं गरजेचं असतं अशावेळी.जे कोणत्याही सल्ल्याशिवाय आपली सोबत करेल आधाराचा हात देईल ! पण दुर्दैवाने खचलेल्याला अजून खचायला भाग पाडणं,त्याच्या चुका उगाळून पुन्हा- पुन्हा सांगणं,काय करायला नको होतं हे ठासून त्याच्यावर बिंबवणं यामुळे समोरची व्यक्ती आयुष्याच्या अजून एका पापुद्रयाखाली जात असते हे आपल्या लक्षातही येत नाही. कारण तेवढं बरं -वाईट किंवा काय चुकलंय/चुकतंय हे तर नक्कीच त्या व्यक्तीलाही समजत असतं.
मित्रहो,कोणी आपल्या स्वेच्छेने खड्डयात जात नसतो किंवा आपण आर्थिक, कौटुंबिक,शारीरिकदृष्ट्या बरबाद व्हावं म्हणून कोणी देवाला नवस बोलत नसतो.सगळं काही सुंदर प्लॅन केलेलं असताना काही वेळा असे विचित्र योगायोग, परिस्थिती उद्भवते की, ती कोणाही मनाने ,शरीराने धडधाकट माणसाला असह्य होईल अशा कोशात घेऊन जाते,हैराण करते,दुःख ,वेदना अपयशाच्या फटकाऱ्यांनी पुरतं बेजार करते... अशावेळी जवळच्यांनी अशा व्यक्तीच्या अजून जवळ राहणं/जाणं महत्वाचं असतं पण दुर्दैवाने ते होत नाही...आपल्याकडे सेलिब्रेटींच्या आत्महत्या चवीने चघळल्या जातात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा राजकारणाचा विषय ठरतो, प्रेमी युगलांच्या आत्महत्या माध्यमाच्या टीआरपी च्या कामी येतात.यात मरणारा हजार वेळा मरतो आणि जिवंत असणारे आपण किती मुर्दाड होत चाललोय हे दाखवून देतात.पण या गर्दीत न बोलता एखाद्याला समजून घेणारी,फुकटचा सल्ला न देता खरं- खुरं बळ देणारी, माणसं कुठं आहेत?
खरंच सुशांत सिंह मला आजतागायत माहीत नव्हता ,पण किमान दिसाड एखादा खचलेला सुशांत सिंह मला व्हाट्स अप/मेसेंजर किंवा फोनवर भेटतोय...(यात खूप मोठ्या पदावरच्या अगदी कौंसेलर आणि स्वतः मोटीवेशनल भाषणे देणाऱ्या व्यक्तीही आहेत )
तुम्ही पण लक्ष राहू द्या न जाणो तुमच्याही घरात,अवतीभवती एखादा सुशांत सिंह असेल त्याचा शेवटचा प्रवास तुमच्या खांद्यावरून होण्याआधी त्याला चार अश्रू ढाळायला तुमचा खांदा द्या..इतकंच !
---दिनेश आदलिंग
स्वयंप्रेरणा, बारामती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा